पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना अमेरिकेनं परत पाठवलं; व्हिसाच्या मुद्द्यावरून देशात प्रवेश नाकारला!
अवघ्या आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या संयुक्त सभेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले होते. एका अट्टल दहशतवाद्याला पकडून देण्यात पाकिस्तान सरकारने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण नुकतंच अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना देशात प्रवेशच नाकारल्यामुळे या मुद्द्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा पाहायला मिळत आहे. के. के. एहसान वॅगन असं या उच्चाधिकाऱ्यांचं नाव असून त्यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तानमधील उच्चाधिकारी वॅगन सोमवारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर उतरले. विमातनतळावर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पाकिस्तानातून अमेरिकेत प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र त्यांच्याकडे होती. वॅगन हे अमेरिकेत सुट्ट्यांसाठी जात असताना त्यांना लॉस एंजेलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हटकलं आणि कागदपत्रांवर आक्षेप घेतला. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
Comments
Post a Comment